अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी — घटस्थापना ते दसरा
मूळ शब्द
अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो ।
प्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो ।
मूलमंत्रजप करुनी भोवते रक्षक ठेवुनी हो ।
ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करिती हो ॥ १ ॥
उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो ।
उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ॥ धृ. ॥
द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो ।
सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो ।
कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो ।
उदोकारे गर्जती सकळ चामुंडा मिळुनी हो ॥ २ ॥
उदो बोला उदो ॥
तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो ।
मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो ।
कंठीची पदके कासे पीतांबर पिवळा हो ।
अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो ॥ ३ ॥
उदो बोला उदो ॥
चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो ।
उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंतःकरणी हो ।
पूर्णकृपे पाहसी जगन्माते मनमोहिनी हो ।
भक्तांच्या माउली सुर ते येती लोटांगणी हो ॥ ४ ॥
उदो बोला उदो ॥
पंचमीचे दिवशी व्रत ते उपांगललिता हो ।
अर्घ्य पाद्य पूजने तुजला भवानी स्तविती हो ।
रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो ।
आनंदे प्रेम ते आले सद्भावे क्रीडता हो ॥ ५ ॥
उदो बोला उदो ॥
षष्ठीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो ।
घेउनी दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो ।
कवडी एक अर्पिता देसी हार मुक्ताफळा हो ।
जोगवा मागता प्रसन्न झाली भक्तकुळा हो ॥ ६ ॥
उदो बोला उदो ॥
सप्तमीचे दिवशी सप्तशृंगगडावरी हो ।
तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नानापरी हो ।
जाईजुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो ।
भक्त संकटी पडता झेलुनि घेसी वरचेवरी हो ॥ ७ ॥
उदो बोला उदो ॥
अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो ।
सह्याद्रीपर्वती पाहिली उभी जगज्जननी हो ।
मन माझे मोहिले शरण आलो तुजलागुनी हो ।
स्तनपान देउनी सुखी केले अंतःकरणी हो ॥ ८ ॥
उदो बोला उदो ॥
नवमीचे दिवशी नवदिवसांचे पारणे हो ।
सप्तशतीजप होमहवने सद्भक्ती करुनी हो ।
षड्रस अन्ने नैवेद्यासी अर्पिली भोजनी हो ।
आचार्य ब्राह्मणा तृप्त केले त्वा कृपेकरुनी हो ॥ ९ ॥
उदो बोला उदो ॥
दशमीच्या दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनी हो ।
सिंहारूढ करी दारुण शस्त्रे अंबे त्वा घेउनी हो ।
शुंभनिशुंभादिक राक्षसा किती मारिसी रणी हो ।
विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो ॥ १० ॥
उदो बोला उदो ॥
नवरात्रात घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत रोज म्हटली जाणारी अंबाबाईची (तुळजाभवानी / जगदंबेची) आरती. प्रत्येक कडव्यात नवरात्रातील एका दिवसाचे वर्णन आहे; "उदो बोला उदो" हा जयघोष प्रत्येक कडव्यानंतर म्हणतात.
१. (प्रतिपदा) अश्विन शुद्ध पक्षात अंबा सिंहासनावर विराजमान झाली. प्रतिपदेला घटस्थापना करून, मूलमंत्राचा जप करून भोवती रक्षक ठेवले जातात; ब्रह्मा, विष्णू, महेश स्वतः आईची पूजा करतात.
धृ. अंबाबाई माउलीचा उदो उदो करा; सगळे उदोकाराने गर्जतात — तिचा महिमा किती वर्णावा!
२. (द्वितीया) चौसष्ट योगिनी एकत्र येतात; त्या सर्वांत परशुरामाची माता श्रेष्ठ. कस्तुरीचा मळवट, भांगात शेंदूर भरून सर्व चामुंडा उदोकार करतात.
३. (तृतीया) अंबेचा शृंगार — मळवट, पातळ, चोळी, गळ्यात मोत्यांचा हार, पदके, पिवळा पीतांबर; अष्टभुजा अंबा अतिशय सुंदर दिसते.
४. (चतुर्थी) सर्व विश्व व्यापणारी जननी प्रसन्न मनाने उपासकांकडे पाहते; पूर्ण कृपा करणाऱ्या मनमोहिनी जगन्मातेपुढे देव लोटांगण घालतात.
५. (पंचमी) उपांगललिता व्रत; अर्घ्य-पाद्य देऊन भवानीची स्तुती होते, रात्री जागरण व हरिकथा होते, भक्त आनंदाने रमतात.
६. (षष्ठी) भक्तांना आनंद होतो; हाती दिवट्या घेऊन गोंधळ घातला जातो. एक कवडी अर्पण केली तरी देवी मोत्यांचा हार देते; जोगवा मागताच ती भक्तकुळावर प्रसन्न होते.
७. (सप्तमी) सप्तशृंगगडावर देवी नांदते; जाई, जुई, शेवंती अशा फुलांची सुंदर पूजा; संकटात पडलेल्या भक्ताला ती वरच्यावर झेलून घेते.
८. (अष्टमी) सह्याद्रीवर उभी अष्टभुजा नारायणी जगज्जननी पाहून मन मोहून गेले; तिला शरण गेलो, तिने आईप्रमाणे सुखी केले.
९. (नवमी) नऊ दिवसांचे पारणे — सप्तशतीचा जप, होम-हवन, षड्रस नैवेद्य; आचार्य-ब्राह्मणांना तृप्त केले.
१०. (दशमी — दसरा) अंबा सिंहावर बसून शस्त्रे घेऊन सीमोल्लंघनाला निघते; शुंभ-निशुंभादी राक्षसांचा रणात वध करते; विप्र रामदासाला तिने आपल्या चरणी आश्रय दिला.